ग्राम पंचायती आणि सरकारी शाळांच्या
भिंतीवर सुविचारांची रंगोटी झाली
हे सारं पाहून आम्हाला वाटलं
देश सुसंस्कृत आणि सुशिक्षित झाला
वकिलीच्या अनेकांना पदव्या मिळाल्या
स्वतंत्र न्याय प्रणालीचा स्विकार झाला
हे सारं पाहून आम्हाला वाटलं
देश न्यायप्रिय आणि अन्यायमुक्त झाला
कोट्यावधींची बजेट सादर झाली
योजनांचा सर्वत्र थर साचू लागला
हे सारं पाहून आम्हाला वाटलं
देश समृद्ध आणि सधन झाला
पर्यावरण कार्यक्रमाला हजेऱ्या वाढल्या
‘झाडे लावा, झाडे जगवा’ जप सुरु झाला
हे सारं पाहून आम्हाला वाटलं
देश हिरवागार आणि प्रदुषणमुक्त झाला
प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रांना चालना दिली
जाहिरातींचा सपाटा भलताच वाढला
हे सारं पाहून आम्हाला वाटलं
देश सामान्य माणसाचा आवाज झाला
सर्वच धर्मांना आणि भाषांना आश्रय दिला
साऱ्या सणाला सुट्ट्याही मिळाल्या
हे सारं पाहून आम्हाला वाटलं
देश धर्मनिरपेक्ष आणि ऐकतावादी झाला
सिनेमागृहात राष्ट्रगीत अनिवार्य झाले
"वन्दे मातरम्" नारेही गुंजू लागले
हे सारं पाहून आम्हाला वाटलं
देश आता भक्तीमय आणि देशप्रेमी झाला