मी जो रस्ता निवडला आहे,
त्याचा शेवट गाठायचा ध्यास आहे
ऐकलं आहे !
दूर दिसणाऱ्या डोंगरा पल्याड,
त्याने वाकडे तिकडे वळण घेतले आहे
रस्ताने चालताना,
अंधार प्रकाशाचा खेळ,
चालूचं राहणार आहे
जातांना तुला काही सांगायचं आहे
मला थोडा उशीर होईल,
पण, मी नक्की परत येणार आहे
मी तुझा निरोप घेईल,
तेव्हा सकाळ असेल
परंतु, सायंकाळ होऊन,
अंधार पडायला वेळ लागणार नाही
त्या लक्ख काळ्या अंधारात,
कोल्ह्यांची कोल्हेकुई
आणि वाघाच्या डरकाळ्याही ऐकायला येतील
तेव्हा भीतीचा थरथराट सुटून
तुझा एकटेपणचा वनवा,
पेटायला वेळ लागणार नाही
मला थोडा उशीर होईल,
तोवर, तू तग धरून थांबशील ना ?
खात्रीने तू वाघिणीच्या धाडसाने
रात्रीच्या अंधाराला भिडशीलही
परंतु, सकाळच्या कोवळ्या सुंदर किरणांनी
आणि फुलांच्या सुगंधाने
तुला मोहित केले तर
तु ज्या वळणावर मला निरोप दिला
तेथे तुझे वळण माझ्या दिशेने
बदलायला वेळ लागणार नाही
मला थोडा उशीर होईल,
पण, तू बदलणार नाही ना ?
ध्येय प्राप्तीनंतर,
आलेल्या कटू गोड अनुभवांना
एक एक करून उजाळत
तू दिलेल्या त्यागाला आठवत
क्षणभरातच परतीचा रस्ता पकडेल
प्रवास लांबणीचा आहे
परंतु, संपायला वेळ लागणार नाही
परत नक्कीच येणार,
वचनबद्ध आहे !
मला थोडा उशीर होईल,
तोवर, तू वाट पाहशील का ?
- रानमोती / Ranmoti