Search This Blog

Sunday, September 27, 2020

सृष्टीस दान


डरकाळी तेजस्विनीची फुटताच
बरसला मेघराज
सरी ओल्या पडताच
धरणी नटली हिरवा साज

कड्या कपारीतुनी वाहताच धारा
बहरली सरीताराणी
पाहून पिसाट वारा
वृक्षवेली हसती मनी

होताच ओलीचिंब माती
सुगंध दरवळला
पाखरे किलबिल गाती
समुद्रही खवळला

निसर्गा तुझा रंगता खेळ
जणू ठरते वरदान
बसतो फुला फळांचा मेळ
करण्या सृष्टीस दान






सोनकळी


ती सुंदर सोनकळी, हसली वाऱ्यावरी 
हा वारा वेडा पिसा 
फिरे तिच्यावरी 
तिच्या अवती भवती 
पिंगा मारी 
ती सुंदर सोनकळी, हसली वाऱ्यावरी 

तिच्या सुंदर रंगाने 
तिच्या सुंदर रूपाने 
तिच्या मनमोहक सुगंधाने 
वारा गुंतला तिच्यावरी 
ती सुंदर सोनकळी, हसली वाऱ्यावरी 

पावसाच्या थेंबांनी 
ओली चिंब होऊनी 
हळुवार स्पर्शानी 
मोहित त्याला करी 
ती सुंदर सोनकळी, हसली वाऱ्यावरी 

रवी किरणात सोनकळी 
भासे चांदणी क्षितीजातली 
हसुनी मनमोकळी 
वाऱ्यासंगे डूली लागली 
ती सुंदर सोनकळी, हसली वाऱ्यावरी


Sunday, September 20, 2020

भूल करू नका..!



आहे सुकलेले पान म्हणुनी
तुडविण्याची भूल करू नका
मी तर अजूनही चिरतरुण
लढ म्हणण्याची भूल करू नका

स्वाभिमान अजूनही जागा
अपमान करण्याची भूल करू नका
अंत:करणात तेज अजूनही जागे
कमकुवत समजण्याची भूल करू नका

वेळ सुवर्ण संपली म्हणून
विसरण्याची भूल करू नका
जिंकेल तुम्हा पुन्हा हरवून
परास्त समजण्याची भूल करू नका 



वेळ


वेळ अदृश्य असूनही 
दृश्य आहे 
वेळ अज्ञानी असूनही 
ज्ञानी आहे 

वेळ अरुप असूनही 
स्वरूप आहे 
वेळ विकृती असूनही 
कृती आहे 

वेळ अपूर्ण असूनही 
परिपूर्ण आहे 
वेळ शून्यत्व असूनही 
पूर्णत्व आहे 

वेळ दुःखांत असुनही 
सुखांत आहे 
वेळ सर्वांची असूनही
कुणाची नाही



Saturday, September 19, 2020

बिडी



पारावरच्या माणसाने
पेटवली होती बिडी 
आयुष्याच्या अंताची
चढत होता शिडी

हळू हळू बिडीचा
धूर सुरु झाला
विचारांचा थवा त्याने
भुतकाळात नेला

धुराने डोळे त्याचे
होत होते लाल
बिडीचं बंडल त्याने
असंच संपवलं होतं काल

जशी जशी बिडी
जळत जात होती
त्याच्याही काळजाला
भाजत नेत होती

श्वास आत घेऊन
तो तिला चेतवत होता
कुठेतरी मनाला
आतूनच खात होता

धुरासंगे दुःखं त्याला
वाटत होती धूसर
क्षणभर का होईना

पडला त्यास विसर
पिपंळाच्या झाडाला
टेकवला त्याने कणा
उरलेल्या बिडीला 
पायाखाली चिरडून
शोधत होता मर्दानी बाणा

- रानमोती काव्यसंग्रहातून 



Thursday, September 17, 2020

लग्नाचा कोट



कवडश्यात कपाटाच्या
वस्त्र होते जुने ओत प्रोत
क्षणात स्मरिला भूतकाळ
दृष्टिस पडताच लग्नाचा कोट

चढवून जणू राजवस्त्र देहावरती
स्वार होताच अश्वावरती
वाजू लागले ढोल ताशे
आजही माझ्या काळजावरती

रुबाब त्याचा काय तो होता
सावळया वर्णावर माझ्या
सवंगडी पाहताच बोलु लागले
दिसतोस जणू बिंडा राजा

कोटावरती चमकदार साखळी
मज संगे डोलू लागली
अक्षतांचा वर्षाव होताच
कोटा संगे बोलू लागली

पडताच गऴयात वरमाला
फुलांचा सुगंध त्यास लागला
हळूच त्याने डाव साधला
उपस्थितांना मोहून गेला

हात फिरविता कोटावरती
वर भावना दाटून आली
घालताच पुन्हा घडी 
लाख आठवणी साठवून गेली

- रानमोती काव्यसंग्रहातून 


सोडताना घर



घरात माझ्या आठवणी साठल्या होत्या
सोडताना त्याला मनात दाटल्या होत्या
कितीदा भांडण येथे झाले होते
मनातले दुःखं आसू बनले होते

बसत होतो आम्ही सारे मिळून मिळून
एकमेकांच्या चुका साऱ्या गिळून गिळून
हसत होतो नेहमी सारे खळखळून
जातांना मन माझे पाहे वळून वळून

भिंतीला त्याच्या होता सुंदर रंग
येणारा जाणारा नेहमी होई दंग
बाल्कनीला एक दोरी होती तंग
पाखंराची त्यावर नेहमी चाले जंग

गूलाबाच्या कुंडीत सुंदर होतं फूल
उडणाऱ्या फुलपाखरांसगे खेळत असे मूल
दिसत होता रस्त्यावरचा उंच उंच पूल
सोडताना घर वाटलं झाली का भूल ...
वाटलं झाली का भूल



Recent Posts

तू राजा मी सेवक (Vol-2)

- रानमोती / Ranmoti

Most Popular Posts