“विज कर्मचाऱ्यांना” अंधारात ठेऊन चालणार नाही...
कोरोना काळात आपण सर्वं अतिदक्षता विभागातील कर्मचाऱ्यांचे नेहमीच आभार मानत आलो आहोत आणि ते मानायलाही पाहिजेत. यामध्ये आपण खासकरून वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार इत्यादींचा प्रामुख्याने समावेश केला आणि त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी ‘दिवे’ सुद्धा लावलेत. परंतु, हे सर्वं करीत असतांना आपण आणखी एका अत्यंत महत्वाच्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश त्यामध्ये करणे आवश्यक होते ते म्हणजे “विज कर्मचारी”. ज्यांनी खऱ्या अर्थाने लॉकडाऊनच्या काळात भर उन्हा-तान्हात आपले दैनंदिन आयुष्य सुरळीत राहावे म्हणून जीवनावश्यक (दिवे, फ्रीज, पंखे) व मनोरंजनाचे साधनं (मोबाईल, टीव्ही, इंटरनेट) अविरत चालावे म्हणून दिनरात कोरोनाची भीती न बाळगता आपल्याला “प्रकाश” दिला अश्या उर्जा विभागातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीच्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कामाला आपण अंधारात ठेवून चालणार नाही.
आता तर परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. ‘निसर्ग’ नावाचं भयावह चक्रीवादळ आणि पावसाळा ज्यामध्ये महावितरणचे कर्मचारी पावसा-पाण्यात, कोरोनाच्या संकटात, रात्री-बेरात्री लोकांच्या घरातील अंधकार दूर करण्यासाठी सतत प्रयत्नरत आहेत. अश्या सर्वं कर्मचाऱ्यांना व त्यांना तितक्याच जोमाने मार्गदर्शन करणाऱ्या सर्वं कार्यतत्पर अधिकाऱ्यांना एक दक्ष नागरिक म्हणून आपण मानाचा मुजरा केलाच पाहिजे. महावितरणने देखील अश्या धाडसी कर्मचार्यांना व अधिकाऱ्यांना प्रकाशझोतात आणले पाहिजे. त्यांचे फोटो, व्हिडीओ व बिकट परिस्थितीत केलेली कामे यांना सोशल मिडियावर व प्रसार माध्यमांसमोर आणले पाहिजे.जेणेकरून, सामान्य नागरिकांचा महावितरण व विज कर्मचाऱ्यांच्या प्रती विश्वास वाढेल व त्यांचे मनोबल उंचावून ते आणखी जोमाने कर्तव्यदक्ष होतील.
सोबतच अत्यंत महत्वाची बाब म्हणजे ज्याप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात आपण न चुकता मोबाईल, टीव्ही केबल चे बिल वेळेत भरून आपल्या सुखसोयींना जोपासत आहोत, तसेच आपण ही सर्वं साधनं ज्या विजेवर अवलंबून आहेत त्या विजेचे बिल भरणे देखील तितकेच अगत्याचे आहे. कारण आज कोरोना सोबतच आपल्यावर जे आर्थिक संकट आले आहे ते विज कंपन्यांवर देखील तितकेच मोठ्या प्रमाणात आलेले असणार. त्यांना देखील विज विकत घेऊन आपल्या दारापर्यंत पोहचवावी लागते. अश्या परिस्थितीत आपण अनाठाई खर्च टाळून आपल्या जीवनावश्यक वस्तूंच्या खर्चावर अधिक भर देणे गरजेचे आहे ज्यामध्ये अन्न, वस्त्र व निवारा या सोबतच विज देखील सामील आहे हे विसरू नये.