आज TAUKTAE CYCLONE च्या निमित्ताने जुन २०२० मध्ये आलेल्या महा भयावह निसर्ग चक्रीवादळाची आठवण झाली. गत वर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे तडाखा बसलेल्या महाराष्ट्र राज्यातील कोंकण किनारपट्टी लगतची वीज वितरण व्यवस्था सर्वाधिक प्रभावित झाली होती आणि ती पूर्वपदावर आणण्यासाठी महाराष्ट्रातील वीज कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात अहोरात्र प्रयत्न केले होते. त्यांच्या निसर्ग चक्रीवादळ काळातील पराक्रमाची पराकाष्टा त्यावेळी देश पातळीवर Role Model म्हणून ओळखल्या गेली. त्याच पराक्रमाची आठवण पुनः एकदा वीज कर्मचारी व अभियंते TAUKTAE CYCLONE मुळे विस्कटलेली वीज वितरण व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी घेत असलेल्या प्रयत्नातून दिसून येत आहे.
यावेळी मात्र कोरोना महामारीच्या संकटाने अधिक रौद्र रूप धारण केले असून देखील जीवाची तमा न बाळगता कर्तव्य सर्वोतपरी मानणारे वीज कर्मचारी दवाखाने, Oxygen प्लांट यांच्यासह तुमच्या-आमच्या सर्वांच्या घरांना अविरत वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने मैदानात रणशिंग फुंकून तयार आहेत. चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आस्मानी संकटांना तोंड देणारे, सामान्यांच्या जीवनात सदैव प्रकाश म्हणून उभे राहणारे वीज कर्मचारी मात्र नेहमीच प्रसिद्धीपासून दूर असतात. याउलट काही क्षणांसाठी जर वीज बंद पडली तर त्याची सर्वमुखाने ऐशी तैशी होते.
जवळपास सर्वच जीवनावश्यक बाबी ह्या विजेवर अवलंबून असून देखील वीज क्षेत्राला व त्यामधील काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हिस्स्याचा न्याय कधीच मिळतांना दिसत नाही. आजही कोरोना महामारीला दीड वर्षाचा कालावधी ओलांडला असला तरी 'फ्रंट लाईन वर्कर' म्हणून त्यांना मानण्यास सामान्यांसह प्रशासन देखील उत्साही दिसत नाही. दुर्दैवच म्हणावं लागेल.
आज TAUKTAE CYCLONE मुळे कोकणामध्ये गंभीर स्वरूपात विस्कळीत झालेले विजेचे नेटवर्क पूर्वपदावर आणण्याकरिता २४x७ कार्यरत असणारे वीज कर्मचारी, अभियंते व अधिकारी खरोखरच कौतुकास पात्र असून तुम्हा-आम्हा, सर्वांसाठी प्रकाशदूतचं म्हणावे लागतील. अंधार दूर करून प्रकाशाचं दर्शन घडविणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद!
(रानमोती / Ranmoti)