दुसऱ्यावर नाही तुझी मालकी
कुठल्या भ्रमात आहेस वेड्या
क्षणभर जीवन विकत घेण्याची
तूच ठरव आहे का तुझी लायकी ?
दुर्गुणांनी वेढलास किती
डोक्यावर अहंकाराचा केवढा भारा
जीवनाच्या व्याख्या असतील कितीक
खरे जीवन आहे तरी काय
नुसता आत बाहेर सोडलेला वारा
चेहऱ्यावर स्मित फुलण्यासाठी
दुसऱ्यांची गरज तुला भासते
डोळ्यातले अश्रू गाळण्यासाठी
इतरांची भिती का वाटते
तूच ठरव कसा तू स्वावलंबी
तेला विना वात जळणार नाही
संवेदनेशिवाय सुख-दु:ख कळणार नाही
तूच ठरव कसे जगायचे
जीवन आनंद अमृत प्राशायाचे
की शिक्षा मिळाल्यागत भोगायचे
अध्यात्म ही किती वाचून झाले
अनेक महात्मे सांगून गेले
जोवर अंतराला जाणणार नाही
तोवर जीवन आनंद गवसणार नाही
तूच ठरव कसे शोधायचे
- राणी अमोल मोरे