अनुवांशिकता आणि परिवर्तन
मनुष्यामध्ये शारिरीक आणि मानसिक गुणदोष काही प्रमाणात अनुवांशिकतेमुळे मागच्या पिढीतून पुढच्या पिढीत स्थलांतरित होत असतात. शारीरिक गुणदोषांचा विचार करता लांब केस आईकडून मुलीकडे, कानावर लांब केस वडिलांकडून मुलांमध्ये तसेच काही शारिरीक आजार जसे की मधुमेह, दमा इत्यादी. आणि मानसीक गुणदोषांमध्ये भावना, बाणेदारपणा, चटकन राग येणे, हुशारी, समजुतदारपणा, समाजाबद्दल आदर या गोष्टींचा अंतरभाव करता येईल.
एखाद्या कुटुंबातील सर्वं व्यक्तींच्या गुणदोषांचा विचार करता त्या कुटुंबाची पिढ्यानपिढ्या चालत आलेली अनुवांशिकता सहज समजता येते. परंतु, शारिरीक दृष्ट्या सोडलं तर मानसीक दृष्टया अशा प्रकारची अनुवांशिकता पिढयानपिढया स्थलांतरीत करण्याचे काम काही समाज घटक देखील करीत असतात. जसे की शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, समाजिक संस्था, प्रत्येक समाज, धर्म संप्रदाय, गावे, शहरे, तालुका, जिल्हा, राज्य विभाग¸ प्रांत देश इत्यादी. मनुष्याच्या अवती-भवती असलेल्या सर्व बाबी मानसीक अनुवांशिकतेला कारणीभूत ठरतात. कळत न कळत मनुष्याच्या मनाची मानसीकता या सर्व बाबींवर अवलंबून असते. हे सर्व कशाप्रकारे प्रभाव टाकते याचा आपण अभ्यास केला तर हे लक्षात येते की, जर एखादी शिक्षण संस्था (शाळा, महाविद्यालय) वर्षानुवर्षे एकाच पध्दतीने शिक्षण पिढयांनपिढ्यांना पूरवत असेल तर त्या शिक्षण संस्थेतून बाहेर पडणा-या ब-याच विध्यार्थ्यांमध्ये त्या संस्थेच्या शिक्षणाच्या पध्दतीचे ठसे उमटलेले दिसतात. ते असे की ती शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगिक विकासासाठी झटत असेल तर तेथील बरेच विद्यार्थी सर्वांगाने विकसीत झालेले आपल्याला पाहायला मिळतात. याउलट जर एखाद्या शिक्षण संस्थेत शिक्षणाचा अपूरेपणा असेल तर तेथील विद्यार्थी पुढे जाऊन स्वत:च हे सिध्द करतात. अशा प्रकारे ह्या शिक्षण संस्था कशा आहेत याचे विश्लेषण आपण तेथील विद्यार्थ्याच्या गुणदोषावरुन करु शकतो. थोडक्यात हे जर वर्षानुवर्षे अन पिढयानपिढया असंच चालत राहिलं तर त्या संस्थेची तेथील शिक्षणाची अनुवांशिकता त्या विद्यार्थीमध्ये आलेली असते. हे झाले शिक्षणाच्या बाबतीत,
आता सामाजिक संस्था, सामाजिक संघटना, समाज त्या त्या समाजातील धर्म आणि संप्रदाय पाळण्याच्या पध्दती या सर्व गोष्टींचा विचार केला तर ह्या देखील शिक्षण संस्थे सारख्याच जबाबदार आहेत. जर एखादा समाज पिढ्यानपिढया शिक्षणाला, स्त्री-पुरुष समानतेला, नवनवीन गोष्टींचा शोध घेण्याला मान्यता देत असेल तर हीच अनुवांशिक मानसिकता पिढयानपुढ्या त्या समाजातील लोकांमध्ये उतरत जाते व कालांतराने त्या समाजाची प्रगती होत राहते. या उलट, जर एखादा समाज हा धार्मिक रूढी, परंपरा व जुन्या बुरसटलेल्या गोष्टीला अंधश्रध्देला थारा देत असेल तर येणा-या पिढ्यांमध्येही तीच अनुवांशिकता दिसुन येईल व त्या समाजाची अधोगती होण्यास कारणीभूत ठरेल.
गाव, शहर, प्रांत, तालुका, जिल्हा राज्य आणि देश अशाच प्रकारची अनुवांशिकता दर्शवित असतात. जर एखादे छोटेशे गाव हे स्वच्छतेला आग्रही धरुन विकास करत असेल तर ती अनुवांशिकता तेथील लोकांमध्ये दिसुन येते. एखाद्या शहरामध्ये रहदारीचे नियम योग्य प्रकारे पाळण्याची अनुवांशिकता असेल तर त्या शहरातील नागरिक इतर शहरात गेल्यावरही आपली रहदारीची अनुवांशिकता दर्शवतात. त्याचप्रकारे एखादे राज्य, प्रांत नवनवीन तंत्र ज्ञानाला उद्योग–धंद्याला पुढाकार देत असतील तर तेथील जनसंख्या आपल्या या अनुवांशिकतेने आपला वेगळा ठसा उमटवतात. संपुर्ण देशाचा विचार करता भारतीय लोक हे जर गणित या विषयामध्ये प्रावीण्य मिळविलेले किंवा संशोधनात नवनवीन गोष्टी निर्माण करण्याची क्षमता सीध्द करत असतील तर ते देखील भारत देशाची अनुवांशिकताच इतर देशात गेल्यावर प्रभावीपणे दर्शवीतात. जर भरतीय लोक विना कारण बडबड करण्यात वेळ वाया घालवत असतील, तर ती देखील देशाची अनुवांशिकताच म्हणावी लागेल.
यावरुन हे सिध्द होते की, कुठल्याही कुटुंबाची, समाजाची, शिक्षण संस्थेची, धर्म संप्रदायाची, गाव, शहर, प्रांत, राज्य आणि देशाची माहीती ही तेथील मनुष्याने पिढयानपिढया दर्शविलेल्या गुणदोषावरुन मिळविता येते. शारीरिक अनुवांशिकता वगळता मानसिक अनुवांशिकता बदलने कठीन जरी असले तरी अशक्य नाही. गरज आहे ती फक्त परीवर्तनाची, पिढयानपिढ्या चालत आलेल्या दोषांना बाजूला सारुन मानव विकासासाठी, प्रगतीसाठी आणि उज्वल भवितव्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांचे अवलोकन करुन ते स्वत:मध्ये रुजवून वेळोवेळी त्यात योग्य तसा बदल घडवून आणण्याची व टिकवून ठेवण्याची. सोबतच अनावश्यक अ-प्रगतीकारक गोष्टीला बाजूला सारून मुळासगट उच्चाटन करण्याची. म्हणजे त्या वाईट गोष्टी अनुवांशिकतेने पुढच्या पिढीत स्थलांतरीत होणार नाहीत व फक्त योग्य गोष्टीच वाढत जाऊन अनुवांशिकतेणे परिवर्तन येऊन मानव जातीचा पर्यायाने समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल. परिवर्तन हा सृष्टीचा नियम जरी असला तरी अनुवांशिकतेने परिवर्तन हा देखील एक नियम होऊ शकतो.
- - राणी अमोल मोरे