Search This Blog

Showing posts with label मराठी साहित्य. Show all posts
Showing posts with label मराठी साहित्य. Show all posts

Thursday, October 19, 2023

स्त्री हा गहनतेचा विषय आहे, अस्तित्वाचा विषय आहे, गंमतीचा किंवा सहज चर्चेचा नाही!

“तुच सृजन, तुच नवनिर्माण, तुच अंत, तुच अनंत”.

काहींना महिला हा विषय मुळात गंमतीशीर वाटत असेल तर कृपया मला माफ करा. कारण माझ्याकडून अशा अपेक्षा केल्या जातात की तुम्ही महीला या विषयावर काही गंमतीशीर लिहा कारण त्यांचा वाचक वर्ग अधिक आहे. महिला ह्या काय सोशल मिडीयाच्या कारखाण्यातील हास्यांचे चुटकुले बनविण्यासाठीचे रॉ-मटेरियल आहेत, की त्या फक्त गंमत जंमत म्हणून वाचायचा, हसायचा आणि डिवचून विसरुन जायचा विषय झाल्यात.

भारता सारख्या समृद्ध आध्यात्मिक आणि पुरातण संस्कृतीमध्ये महिला किंवा स्त्रीया हा उच्च कोटीचा पुजणीय विषय आहेत, विषयचं नाही तर उच्च कोटीच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. या देशात स्त्रियांची संवेदना, त्यांचा आदर त्यांची कल्पकता, कलात्मकता आणि त्याचं स्त्रीत्व म्हणजेच स्त्रीगुन यावर संशोधन, विचार मंथन होण्या इतपत वाव असतांना देखील, तो कोठून बरे गंमतीचा विषय झाला आणि या प्रगल्भ समाजाने त्याचा स्वीकारही कसा काय केला आणि खासकरून स्त्रीजातीने आपल्यावर होणा-या या हास्याच्या प्रयोगाला विरोध न करता त्याला तसेच चालू ठेवण्यास वाव का बरं दिला याचंच नवल मानावं लागेल.

(स्त्री फक्त भोग्य आहे.)

कधी पुरातण काळी स्वत:ला ज्ञानी पंडीत म्हणवणा-या महंतानी सांगीतले होते की मुळात स्त्रीकडे चेतना, आत्मा वगैरे काही नसते, ती फक्त पुरुषांकडेच असते, म्हणून जशी पुरुषाला आध्यात्माच्या मार्गावर गेल्यावर मुक्ती मीळते तशी स्त्रीला मीळत नाही. स्त्री फक्त भोग्य आहे. मग मला या महंताना विचारायचे आहे. ती आदिशक्ती महाकाली कोण होती जिने दानवांचा शिरच्छेद करुन रक्त प्राशन केले, ज्या दानवांनी तीला भोग्य समजले, तीला कमी लेखले, त्याचं काय झालं हे आपण मोठया अभिमानाने सांगत फिरतो.

नंतरच्या काळामध्ये स्त्रीवर जो अत्याचार झाला, तीला गुलामगिरीच्या सक्त बेडयामध्ये डांबवलं गेलं ते तर अविश्वसनीय आहे. या गुलामगीरीच्या खुना इतक्या खोलवर रुजल्या की जणू स्त्रीच्या जनुकावर त्याची कोडिंग होऊन त्या पिढ्यान पिढ्या सतत स्त्रीमध्ये उतरत गेल्या. ती मुक्त झाल्यानंतरही तीच्या मनावर स्त्री ही फक्त भोगाची वस्तू आहे असा प्रभाव झाला. तो प्रभाव आजही कायम दिसतो, फरक फक्त एवढाच की तेव्हा तीला हे सांगाव लागलं आणि आता मात्र ती तो विचार घेऊनच जन्माला येते. आपण नेहमी म्हणतो की इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं आणि आपल्याला त्यांची गुलामी बळजबरीने स्वीकारावी लागली. परंतू स्वातंत्र्यानंतरही आजच्या समाजात असं दिसुन येते की इंग्रज भौतीक दृष्टया येथून गेले असले तरी मानसीक दृष्टया ते आपल्यामध्ये आजही टिकून आहेत. आताची ही पाश्चात्य गुलामी भारतीयांनी स्वत: स्वीकारली आहे. त्यांना स्वत:ची संस्कृती व भाषा पाश्चात्य देशांपेक्षा हीन वाटते.

(तीने काहीशी गुलामी स्वत:च स्वीकारली आहे.)

तसंच काहीसं स्त्रीच झालं आहे. आजच्या समाजात स्त्री शिक्षीत व मुक्त असुनही तीने काहीशी गुलामी स्वत:च स्वीकारली आहे. उदाहरणासहीत स्पष्टीकरण दयायचं झालं तर जेव्हा ती स्वत:ला आरश्यात बघते, तेव्हा ती स्वत:ला स्वत:च्या दृष्टीने न बघता पुरुषांच्या दृष्टीने बघते, म्हणजे एखाद्या पुरुषाने तिच्याकडे बघीतल्यानंतर त्याला काय आवडेल त्या अनुषंगाने तिचा श्रृंगार अधिक झुकलेला असतो आणि तसच काहीसं वागणं देखील अंगीकृत केललं असतं. ब-याच वेळेला एखादा पोषाख तिच्या प्रकृतीसाठी व्यवस्थीत किंवा कम्फर्टेबल नसतो आणि तीच्या सहजतेसाठी देखील अडचणीचा असतो, तरीसुध्दा तो फॅशन च्या नावाखाली परीधान केला जातो.

भगिनींनो विसरू नका तुम्ही स्वत:मध्येच अद्भूत आहात, सर्वस्व आहात !

भगीनिंनो तुम्ही कारखाण्यातुन तयार झालेलं प्रोडक्ट आहात का? की शोभेच्या वस्तू आहात? ज्याला विकत घेणा-यांच्या किंवा बघणाऱ्यांच्या हीशोबाने पॅकेजींग किंवा नटण्याची गरज पडते. ते करा जे स्व:ताला सहज, सरळ आणि उपयोगी आहे. विसरू नका तुम्ही स्वत:मध्येच अद्भूत आहात. तुम्हीच आहात सर्व आणि ते सर्वस्व तुम्ही स्वतःमधूनच उत्पन्न करू शकता बाहेर शोधण्याची गरज तरी काय? स्वत:च्या विचारांच्या गहनतेमध्ये उतरुन स्वत:ला फुलवत चला, दुस-यांच्या आवडी नीवडीचा विचार फूलवण्यापेक्षा स्वत:च्या मनाचा विचार करा. इतरांना डोक्यावर घेण्याची गरज तरी काय ?

(स्त्री-पुरुषांची विवीधता या जगण्याला आणखी सुशोभीत बनवते)

स्वत:ला कमी किंवा जास्तही न लेखता, जे गूण तुमच्याकडे आहेत त्यांच्या तळाशी जाऊन स्वत:च्या व्यक्तीमत्वाचा विकास करा. काय गरज आहे तुम्हाला कोणाच्या बरोबरीत किंवा अधिपत्याखाली जगण्याची तुमचं जगणंच मुळात वेगळ आहे, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने पुर्ण जगा. जगतांना विविधतेची गरज असते बागेमध्ये वेगवेगळी फुले वेगवेगळया रंगाची गंधांची अधिक शोभून दिसतात. तसंच हे जग एक बगीचा आहे, ज्यामध्ये स्त्री-पुरुषांची विवीधता या जगण्याला आणखी सुशोभीत बनवते, फुलवते. स्त्री फक्त स्त्रीच होऊ शकते तीला पुरुष बनण्याची गरजच नाही?

तुम्ही जगत आहात, मोकळा श्वास घेण्यासाठी, आजवर मोकळा श्वासही खुप घेतला, आता भरपूर मनसोक्त श्वास घेण्याची वेळ आली आहे. सोबतच एका नवीन विश्वात प्रवेश करण्याची कारण “तुच सृजन, तुच नवनिर्माण, तुच अंत, तुच अनंत”.

(दुस-याला भरवण्याआधी स्वत:ला भरवून सक्षम कर)

दुस-या जीवाला जन्म देण्याआधी तू हा विचार कर तू जशी जन्माला आणल्या गेली आहेस तो तुझा जन्म तुला मान्य आहे का ? नसेल तर मग आधी स्वत:ला नविन जन्म दे. दुस-याला भरवण्याआधी स्वत:ला भरवून सक्षम कर. तू कोमलतेच्या उपमेखाली अबला कमजोर बनू नकोस. कारण एक जिवंत स्त्रीच एका जीवंत जीवाला जन्म देऊ शकते. मृतक विचाराने जन्म दिलेले जीव मृतकच जन्माला येतील, मृतकच जगतील आणि मरण्याचा तर वीषयच नाही ते जन्मालाच मृतक आलेले असतिल.

या मनुष्य जातीला नष्ट करण्याची ताकद जेवढी नैसर्गिक आपत्तीमध्ये आहे, तेवढी ताकद स्त्रीमध्ये देखील आहे. कारण तीने जन्म दयायचा का नाही हे जर ठरवलं तर ही मनुष्यता लवकरचं संपुष्टात येईल. सद्यास्थितीत जापान देशात हेच होतय, तेथील स्त्रीया लग्न आणि मूल यापासुन स्व:ताला दुर ठेवत आहेत परिणामत: जापानची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. हे जगातील सर्व देशाबरोबर होण्याची शक्यता आहे.

यावरुन आपल्याला लक्षात आलंच असेल की स्त्री हा गहनतेचा वीषय आहे. अस्तित्वाचा विषय आहे. गंमतीचा किंवा सहज चर्चेचा विषय नाही. जय हिंद, जय भारत!


-रानमोती-
(राणी अमोल मोरे)
कवियत्री, लेखिका, कृषितज्ञ

Saturday, September 12, 2020

विदर्भातील कोरडवाहू शेती आणि मानसिकता…

महाराष्ट्रातील शेती शेतकरी या दोन गोष्टींवर चर्चा झाली, की पश्चिम महाराष्ट्र नेहमीच विदर्भापेक्षा सरस ठरतो. कारण, तेथील शेती ही आपल्या शेतक-याला सधन करुन सोडते आणि शेतकरी सुध्दा आपल्या शेतीची पुरेपूर काळजी उपयोग घेऊन आपले दैनंदीन जिवनमान उंचावतो. परंतू, विदर्भात मात्र हे चित्र पहावयास मिळत नाही, याउलट येथील शेतकरी जलसिंचनाच्या अभावी शेतीकर्जाने दिवर्सेदिवस ढासळूत असून, गत काही वर्षापासून आत्महत्येच्या मार्गाने वळतो आहे. महाराष्ट्र हे एकच राज्य आणि राज्यातील वेगवेगळया प्रदेशांचा विकास आराखडा अभ्यासल्यास साम्य कोठेही आढळत नाही आणि ते लपवण्यासाठी आपण लगेच म्हणतो, भौगोलिक दृष्ट्यांचाच तो विरोधाभास, त्यात शेतकरी किवा इतर कोणी काय करणार? हे सर्व मान्य आहे, परंतु ह्या सर्व गोष्टींमुळेच का विदर्भाची अशी दयनीय अवस्था आज दिसत आहे, का त्यामागे आणखी काही कारणे आहेत जी आज आपल्याला शोधण्याची नितांत गरज आहे.

राज्यातील विविध प्रदेशांचा विचार केला असता, सर्वाधीक वेगळेपणा दिसून येतो तो येथे पडणारा पाऊस आणि शेती सिंचनाची उपलब्धता. कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात सरासरी पाऊस कमी पडतो आणि सिंचनाची उपलब्धता देखील कमीच आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेती ही तेथे उपलब्ध असलेल्या सिंचन व्यवस्थमुळे असल्याने परिणामी तेथील शेती मालाचे उत्पादन हे इतर प्रदेश विदर्भाच्या तुलनेत जास्त आहे. तर याउलट विदर्भाची जवळ जवळ सर्व शेती ही मुबलक सिंचना अभावी सर्वातोपरी पावसावर अवलंबून आहे, ज्यामुळे येथील उत्पादन देखील पावसासारखे भगवान भरोसेच कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला.

संशोधन आणि अभ्यास यामधून असे लक्षात आले की विदर्भामध्ये नैसगिक साधनसंपत्ती पुरेपुर असून देखील राजकीय मानसिकता, शेतक-यांची सामाजिक आणि आर्थिक विषमता, शैक्षणिक मागासलेपणा, सिंचनाच्या अपु-या सोयीसुविधा यासर्व गोष्टीमुळे शेतीच्या उत्पादनात येथील शेतक-यांच्या विकासात अनिश्चितता निर्माण झाली आहे. विदर्भातील शेतक-यांच्या विकासावर राजकीय संशोधनिक गांभीर्य वेळीच निर्माण होणे गरजेचे आहे, अन्यथा येथील शेतकरी अधिक काळोखात गुरफटत राहील परिस्थितीची फक्त चर्चा करण्याशिवाय आपल्या हाती काहीच राहणार नाही.

विदर्भामध्ये कापुस हे महत्त्वाचे नगदी पीक घेतले जाते. जवळपास आठ ते अकरा जिल्हयात कापूस माठया प्रमाणात पिकवला जातो. कापुस हा पाठीचा कणा म्हणून अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, बुलढाणा या जिल्हयात ओळखला जातो. विदर्भामध्ये १२ लाख हेक्टर जमिन ही कापूस पिकाखाली आहे परंतू ४००-६०० मीमी या प्रमाणात पडणारा कमी पाऊस, सिंचनाची कमी उपलब्धता मातीमधील अन्न-द्रव्याची कमतरता, किटकांचा प्रादुरर्भाव आणि आणखी काही भौगोलिक भौतिक कारणे यामुळे कापुस या पिकाची उत्पादन क्षमता कमी झाली आहे. विदर्भामध्ये महाराष्ट्राच्या कापुस उत्पादनाच्या १५% कमी उत्पादकता तर देशाच्या ४६% कमी उत्पादकता आज निर्माण झालेली आहे. तसेच, जास्तीत जास्त बी.टी. वाणाचा शेतक-यांकडून होणारा वापर, बी.टी. हे कमी पावसाला अती संवेदनशील असल्याने उत्पादन कमी होण्याची शक्यता आणखी वाढत आहे. 

विदर्भामध्ये फक्त ८-१० % कापुस जमीन ही चांगल्या ओलिताखाली आहे. नैसर्गिक पाण्याची साधने व पडणारा पाऊस साठवून ठेवून जवळपास सर्व कापूस जमीन ही ओलिताखाली आणणे गरजेचे आहे. संपूर्ण विदर्भामध्ये पडणा-या पावसाच्या जवळपास १५-२०% पाणी हे कापुस पिकाखाली असलेल्या जमिनीवर पडतो व वाहून जातो. त्याचबरोबर कुठल्याही मोठया-मोठया नदया विदर्भातून वाहत नाहीत म्हणून पडणा-या पावसाचे योग्य नियोजन हा एकमात्र मार्ग आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे संपुर्ण वर्षभराच्या मान्सुनचे पाणी मुरवणे व साठवून ठेवणे आवश्यक आहे. हे सर्व आपण पाणलोट क्षेत्र विकास, पाणी साठवण कार्यक्रम, कमी खर्चात धरणे, बंधारे शेतक-यांना बांधून देणे, इत्यादी कार्यक्रमांद्वारे साध्य करु शकतो. तसेच, पावसाचे पाणी वाचवण्याचा दूसरा उपाय म्हणजे पाऊसाचे पाणी वाहुन न जाऊ देता मातीत मुरवणे आणि दुसरे म्हणजे मातीत साठवून ठेवणे त्यामुळे मातीचा ओलावा टिकून राहतो, जमिनीतील पाण्याची पातळी वाढते व पाणी देण्याची गरज कमी भासते अशा प्रकारे आपण पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून सिंचनाची उपलब्धता निर्माण करु शकतो.

या काळोखातून वर येण्यासाठी, या सर्व बाबींवर मात करण्यासाठी सरकारी तसेच खाजगी योजना आखल्या गेल्या आहेत. उदा. (VIIDP, RKVY, MNREGS, IWMP, ISOPOM, NHM, MMA इत्यादी) VIIDP (Vidarbha Intensive Irrigation Development Program) ‍हा कार्यक्रम बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा नागपूर, चंद्रपूर, गोंदीया, गडचिरोली आणि भंडारा या जिल्हयामध्ये राबवण्यात आला आहे. जवळपास १००० हेक्टर जमिनी कापूस पिकाखालील या र्काक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे.

VIIDP चा महत्त्वाचा उद्देश विदर्भामध्ये पावसाचे पाणी साठवून ठेवणे त्याचबरोबर सिचणा-या सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे, कापसाचे उत्पादन वाढवणे आणि वेगवेगळ्या पिकाचे नियोजन करणे, जास्तीत जास्त शेती ही कापूस पिकाखाली आणणे, त्याला पाणी पुरवठा करणे, जमिनीचा ओलावा टिकवून ठेवणे, पावसाचे पाणी साठवून त्यातून सिंचनाच्या सोयी उपलब्ध करुन देणे, तसेच तुषार आणि ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची उपलब्धता वाढवणे हा आहे. त्याचबरोबर, विदर्भातील एकमेव कृषी विद्यापीठ (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ) येथे सुध्दा कापूस व पावसाच्या पाण्याचे नियोजन त्यामुळे या सर्व गोष्टीवरअभ्यास व संशोधन झाले व सुरु आहे. परंतु, विदर्भातील शेतकऱ्याची परिस्थिती काही बदलत नाही कारण, या सर्व गोष्टीला विदर्भाचा शेतकरी वर्ग जागरुक नाही, कृषी विद्यापीठात झालेले संशोधन शेतक-यांपर्यंत पोहचायला पाहिजे त्या प्रमाणात पोहचू शकत नाही आणि सरकारच्या योजना कृषी खात्यातील काम करणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त निवडक शेतकरी वगळता इतर शेतक-यांना माहिती सुध्दा होत नाहीत, याउलट परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पहायला मिळते.

पश्चिम महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ हे आपले संशोधन शेतक-यांच्या शेतापर्यंत पोहचवत आहेत. त्याचबरोबर कृषी विभागाच्या सर्व योजना तेथे राबवल्या जातात सर्वात महत्त्वाच म्हणजे येथील शेतकरी वर्ग हा जागरुक आहे. तसेच, शेतकरी व कृषी विद्यापीठे यांचा चांगला समन्वय येथे आपल्याला पाहायला मिळतो. नवीन-नवीन योजनांचा फायदा घेऊन तसेच नवीन-नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळवून तेथील शेतकरी त्याचा प्रयोग सर्वतोपरी करतात आणि यशस्वी होतात व आपली यशोगाथा आपल्या शेतकरी मित्राला सांगुन त्याला सुध्दा आपल्याबरोबर सधन करतात. परंतु, विदर्भाचा बळीराजा मात्र या सर्व गोष्टींपासून वंचित राहतो कुठल्याही गोष्टीची नवीन कुतूहलता त्याला वाटत नाही, वाटली तरी शेतकरी एकमेकांबरोबर चर्चा करत नाहीत. तसेच, एकजूटीने नवीन योजना विदर्भात राबविण्याकरीता सरकारला आग्रही राहत नाहीत. त्यामुळे विदर्भाची परिस्थिती जशीच्या तशीच राहत आहे.

विदर्भातील शेती पावसाच्या पाण्याने कोरडी ठेवलीच आहे पण शेतकरी देखील आपल्या प्रयत्नांने ती ओलिताखाली आणू इच्छित नाहीत. कारण, विदर्भातील शेती तर कोरडवाहू आहेच सोबत येथील मानसिकता देखील कोरडवाहूच बनत चालली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर शेतक-यांना आत्महत्याच करावी लागणार. काळ बदलला आहे, वेळ बदलली आहे, काळाप्रमाणे बदलतो तो टिकतो, नाहीतर मागे पडतो, म्हणून उठा माझ्या बळीराजांनो पेटून उठा. तुमच्या जवळ जी काळी कसदार जमीन आहे ती अवघ्या महाराष्ट्रात शोधून मिळणार नाही .काय झालं पाऊस कमी पडला किंवा जास्त पडला. सोनं पिकवणारी जमीन आहे तुमच्याकडे. म्हणतात प्रयत्नाने परमेश्वर मिळवता येतो आणि आपला परमेश्वर आपलं पिक आहे जे आपलं कुटुंब पोसण्याची टाकत ठेवतो. चला आता आपण सुध्दा जागे होऊ, सर्वांगाने डोळे उघडे ठेवून बघू या जगाकडै आणि बदलणा-या निसर्गाकडे, चालकासारखे सुगाव घेऊ या नवनवीन शेतीवरील संशोधनाचा, माहिती तंत्रज्ञानाचा आणि नवनविन सहकारी योजनांचा. आपणही या सर्वांचा पुरेपुर फायदा घेऊ, सोन पिकवू आणि सधन बनवूया स्वत:ला देशालाही. विसरु नका याच -हाडी मातीने भारताला पहिला कृषी मंत्री दिला, याच मातीने हरित क्रांतीचा जनक दिला आहे, त्यांच्याच स्वप्नांना साकार करु, चला संकट पछाडण्याआधी आपण संकटांना पछाडू.

-रानमोती / Ranmoti 

VIIDP  वरील शोध निबंधाच्या अनुषंगाने दिनांक २३-ऑगस्ट-२०१३ रोजी प्रकाशित झालेल्या लेखाचे पुनः प्रकाशन (http://agricoop.nic.in/sites/default/files/VIIDP.pdf) 

Friday, September 4, 2020

माझी फिल्मस्टार टिचर

मी आपना सर्वांना एका Filmstar ची म्हणजेच माझ्या तमन्ना Teacher ची story share करणार आहे. अर्थातच त्या आता पण Teacher चं आहेत फक्त student ऐवजी त्यांच्या लाखो Fans च्या.

Teacher आणि Actor दोन वेगळे Profession असले तरी दोघांचाही उद्देश एकच Teaching. माझ्या Teacher मुळातच एका Filmstar सारख्या वाटायच्या. त्यांची Teaching movie सारखी Entertaining असायची. आम्हाला School मध्ये कंटाळावाणे वाटू नये म्हणून Teacher आपल्या Teaching मध्ये थोडा Movie mode आणत. त्या Class मध्ये आमचा Mood fresh करण्यासाठी नेहमी म्हणायच्या आयेंगे, मेरे Chalk और Duster जरुर आयेंगे. त्यांचं Teaching आमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे सांगण्यासाठी त्या अधुन मधुन बाहुबलीचा Dialog मारायच्या मेरी Teaching ही मेरा Passion है. एखादवेळी बोलताना किंवा लिहतांना Grammar mistake झाली तर त्या आवर्जुन बोलायच्या “Don’t underestimate the power of grammar”. अशाप्रकारे त्यांच्या आगळयावेगळया Teaching style मुळे त्या आम्हा students च्या प्रिय होत्या.  

एके दिवशी School च्या Annual function मध्ये त्यांनी Opening classical dance केला. त्या Programme ला प्रसिद्ध Director श्री. किरण मोहर आले होते. त्यांना त्यांच्या New movie “Teacher of the year” साठी एका Lady teacher ची जी गरज होती. ती आमच्या Teacher मधुन त्यांना मिळाली व Teacher Filmstar झाल्या. Teacher चे खुप Movie super hit झालेले आहेत. तुम्हीही बघितलेच असतील, हो तोचजब बाहुबली School जाता था ! “No इडीयटसआणि नुकताच त्यांचा एक Movie Oscar ला पण गेला होता “Oldton”. (Newton नाही बरं).

त्या भेटल्यांनतर मी त्यांना प्रश्न केला होता,Teacher तुम्ही आम्हाला  School ला सोडुन का गेल्या ?. त्यावर त्या म्हणाल्या मी ही School सोडुन एका नवीन School मध्ये शिकायला आणि शिकवायला गेली आहे. मी जेव्हा तुम्हाला शिकवायची तेव्हा खुप मेहनत घेऊनही कधी-कधी एखादी गोष्ट तुम्हाला समजवू शकत नव्हती पण तीच गोष्ट, अमीर खान सारखे कलाकार क्षणांत शिकवुन जात होते. आणि म्हणुन मी Filmstar व्हायचें ठरविले. कारण एक उत्तम Movie आणि उत्तम Character समाजात बदल घडवुन आणू शकतो. आणि हो मी फक्त त्याच Movie करते ज्यामधुन Social massage जातो.

हे एैकुन मला कळले की, त्यांचे Teaching आजही सुरुचं आहे. त्या आता फक्त आमच्या Teacher नसुन लाखो Fans च्या Teacher झाल्या आहेत.

आणि हो एक सांगयचेच विसरले तमन्ना Teacher चा New Year ला “Teacher of Avengers” हा नविन Movie येतोय, नक्की बघा.

Thank you..!



Story for the kids by Ranmoti / रानमोती 

Recent Posts

तू राजा मी सेवक (Vol-2)

- रानमोती / Ranmoti

Most Popular Posts