Search This Blog

Tuesday, July 7, 2020

मशागत मनाची अन बुध्दीची निवडलेल्या ध्येय प्राप्तीची

आनंदाच्या क्षणात विसर पडला, तरीसुध्दा त्यावेळी सुप्त अवस्थेत असतेच, ते मनाच्या कोप-यात कुठेतरी दडलेलं. शिंपल्यात मोतीच जणू, शांततेत, चिंतनात, मनात, ओठांवर, डोळ्यात अगदीच सर्वत्र पसरलेलं, दुसरं तीसरं काही नाही, माझं ध्येय, माझं स्वप्न.
 
प्रत्येक सृजनशील मनुष्याचे काही स्वप्न, काही ध्येय असतात. जेव्हा मनुष्याला स्वप्न दिसायला सुरुवात होते तेव्हा तो बरीच स्वप्ने बघतो. मोठया मानसाची स्वप्ने देखील मोठी आणि इतरांपेक्षा वेगळी असतात. स्वप्न आणि ध्येय जेव्हा एक होतात तेव्हा ते झोपेत दिसनारी स्वप्ने राहत नाहीत, तर ती झोप उडवणारी स्वप्न म्हणून ओळखली जातात. मनुष्य जेव्हा माझं ध्येय, माझं स्वप्न याबद्दल विचार करायला लागतो तेव्हा जणू त्याची अवस्था एखाद्या निरव्यसनी मनुष्याने व्यसन करण्याचा विचार मनात आणावा अगदी तशीच काहीशी झालेली असते. कारण व्यसन करायच किंवा लावायच म्हणजे नशा हा जोडीला असनारच, त्याचप्रमाणे या ध्येय आणि स्वप्नांचा सुध्दा नशा येणारचं. मग त्या निरव्यसनी माणसाने सुरुवातीला व्यसनासाठी प्रोत्साहीत होऊन हळुहळु त्या व्यसनाला अंगीकारायचं. सुरुवातीला त्याचं शरीर आणि मन त्याला एकरूप होत नाही परंतु जसा-जसा वेळ जातो, तसा-तसा तो व्यसनाधीन होत जातो. मग एकदा का तो पूर्णपणे व्यसनात बुडाला की त्याला त्याच्या शरीराची, मनाची किंवा इतर कुठल्याच गोष्टीची विशेष गरज किंवा काळजी वाटत नाही. अगदी त्याचप्रमाणे मनुष्याच्या या ध्येय आणि स्वप्नांच्या बाबतीत होते. हळुहळु आपली स्वप्ने, आपली ध्येये या मार्गाने एकदा का तो लागला की तो फक्त त्यातच एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. आपल्या आजु बाजुला काय चालु आहे यात तो विशेष लक्ष देत नाही. ध्येय पुर्तीसाठी जे कष्ट, सोसावे लागतात शरीराला त्या वेदना जाणवतच नाही, कारण त्या ध्येयांचा आणि स्वप्नांचा नशा त्या वेदना जाणवूचं देत नाहीत.

मनुष्याचे मन विचाराने परिपक्व झाले की तो एक ध्येय आणि एक स्वप्न परीपुर्ततेसाठी निश्चित करतो. निश्चित ध्येय व स्वप्न साकारतांना झालेल्या कष्टातुन जी अशांतता निर्माण होते ती अशांतता निश्चित ध्येय व स्वप्न साकारतांना उच्च कोटीचा आनंद, आत्मसन्मान, विशालता, परिपक्वता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसीक समाधान या सर्व गोष्टी शिकवून जाते. म्हणून ध्येय व स्वप्नांची निवड मनाने आणि तर्कशुद्ध बुद्धीने केलेली असली पाहिजे कारण त्याच दिशेने आपले मन, बुध्दी आणि शरीर धावत सुटते. हे सर्व साकारतांना भौतीक परिस्थिती कितीही प्रतिकुल असली तरी या मन, बुध्दी आणि शरीर यांच्या एकत्रीतपणामुळे त्याचा विशेष परिणाम होत नाही. मग अश्या प्रतीकुल परीस्थितीतून सुध्दा ध्येय आणि स्वप्नाने ग्रासलेला प्रत्येक मनुष्य समाधानी, शांत आणि सुखाचा अनुभव नक्कीच घेतो. 

कधी कधी हे सर्व सुरळीत चालु असतांना म्हणजे ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करतांना एक रस्ता निवडला, नंतर जाण्यासाठी कुठले साधन बरोबरीला घ्यायचे, कुठल्या वेगाने जायचे किंवा कुठे वेग वाढवायचा आणि कुठे कमी करायचा या सर्व गोष्टी शिकून झाल्या असतांना अचानक अनुकुल परिस्थिती प्रतिकूल परिस्थितीत बदलून जावी अशी एखादी घटना घडते. एखादवेळी त्या घटनेची तीव्रता ऐवढी जास्त असते की मन, बुद्धी आणि शरीर या तीनही गोष्टींना विचलीत करण्याची शक्यता निर्माण करते. ती एका महत्त्वाच्या कारणामुळे प्रभाव करुन जाते ती म्हणजे त्यावेळची त्या मनुष्याची आर्थिक, सामाजिक परिस्थिती. मग इथेच सर्व थांबणार किंवा थांबवावे लागणार असा विचार त्याच्या मनात शिरकाव करू लागतो. त्यावेळी बुध्दी त्यावर आणखी जोर लावून त्या दिशेने शरीराला कामाला सुरुवात करते. 

म्हणजे ही वेळ अशी असावी, जणू तो व्यसनात बुडालेला व्यसनाधीन त्याला कोणी अचानक जागे करावे आणि त्याच्या वर्तमानातील गोष्टींसाठी त्याने व्यसन करणे थांबवावे मग त्याचं मन, शरीर आणि बुध्दी हे तिन्हीही वेगळे आहेत याची त्याला प्रथमच जाणीव व्हावी तसेच काही तरी. परिस्थितीच्या रोषामुळे वर्तमान गरजेपोटी तो ह्या सर्व गोष्टी थांबवेलही. परंतु तो मनुष्य खऱ्या अर्थाने जगू शकणार नाही. कारण त्याचा जगण्याचा खरा आनंद त्या व्यसनातील नशेत दडलेला असतो. तो तिथे सर्व जग विसरुन कुठल्याही शारिरीक वेदनांचा त्रागा न करता शांत असतो. परिस्थितीच्या गरजेपोटी तो आपल्या मनाच्या ध्येयाकडे जाणाऱ्या रस्त्याने जायचे थांबवतो देखील परंतु, त्याने ज्या जगण्यात रस घेतलेला असतो व त्यातील आनंद आता त्याला मिळणार नसतो त्यामुळे त्याच्या मनाची, शरीराची आणि बुद्धीची अगदी दिशाचं बदलून गेलेली असते. जेव्हा मनुष्याने ध्येय प्राप्तिसाठी एखादा मार्ग निवडलेला असतो आणि त्या मार्गाने, त्या दिशेने सम ध्येयाचे काही इतरही लोक त्याला दिसतात त्या वेळेला हा परिस्थितीमुळे ध्येयापासून दूर गेलेला त्यांना अनुभवातून आणि त्याने योजलेला योग्य मार्ग दाखवून चालायला सांगत सुटतो. परंतु,सत्य हेच असते की जास्त वेगाने तोच धाव घेतो जो आपल्या ध्येयाशी आणि स्वप्नांशी एकरुप असतो. जणू काही एकरुप मनुष्य ह्या शर्यतीतला भरधाव धावनारा ससा तर इतर कासवे

ध्येय आणि स्वप्नांचा त्याग करून गरजेपोटी निवड केलेल्या मार्गाने हा एकरुप मनुष्य चालत सुटतो. त्याला वाटते काही विशेष फरक पडणार नाही माझी खरी स्वप्ने सुटलीत तरी माझी गरज हीच आहे, ज्या मार्गावर मी आज चालतो आहे. मग हळुहळू तो त्याची ध्येये आणि स्वप्ने विसरायला लागतो आणि आहे त्या परिस्थितीत किंवा त्या जाणा-या मार्गावरच आनंद, समाधान, सुख या सर्व गोष्टींचा शोध घ्यायला लागतो. कधी कधी त्याला उगाच भास होतो की तो त्या मार्गानेही आनंदी आणि समाधानी होऊ शकतो पण तो फक्त भासच उरतो. परंतु, मनाने निवडलेलं ध्येय आणि स्वप्न त्याचा पाठलाग सतत करतच राहतात. त्याला विसर पडत नाही आणि तो ज्या मार्गाने जात असतो त्यावर तो परत परत त्याच पूर्वीच्या ध्येयाला आणि स्वप्नांना बघत सुटतो. कारण त्याचा खरा आनंद त्यातच दडलेला असतो. मग अशा वेळी जर त्याला हे कळले की ती कासवे आज त्याच्या पुढे निघुन गेलेली आहेत, तर मग त्या मनुष्याच्या मनातील अव्यवस्थेला काही सीमाच उरत नाही. त्यावेळेला त्याचं मन, बुध्दी आणि शरीर काहीतरी गमावलय या भावनेत बुडून त्याचा उजाळा वारंवार करत राहते. 

आता येथूनचं आपण आपल्या ख-या विषयाकडे वळूयात. मनाच्या व बुध्दीच्या मशागतीचा. परंतु, त्याचं तर तारतम्यचं नाही. लागेल नक्कीच लागेल. ते असं की जर एखादा मनुष्य ख-या अर्थाने त्याने निवडलेल्या ध्येयाचा व स्वप्नांचा विचार दिवस-रात्र करत असेल आणि त्याचं संपुर्ण सुख, मनाचे समाधान आणि मन:शांती जर ख-या अर्थाने त्याच निवडलेल्या ध्येयात गुरुफटलेली असेल तर तो नक्कीच त्या ध्येयापर्यंत आणि स्वप्नांपर्यंत पोहोचणार. त्यासाठी त्याला एकचं महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे निवडलेल्या ध्येयावर संपुर्ण लक्ष केंद्रीत करणे व त्याचबरोबर वाटेल ते परिश्रम घेण्याची तयारी. ह्या सर्व गोष्टी करतांना त्याला सर्वप्रथम गरज आहे ती त्याच्या मनाच्या व शरीराच्या मशागतीची. ज्याप्रमाणे उत्तम जोमदार पीक मिळवीण्याच्या ध्येयाने शेतकरी आपली जमीन ही चांगल्या मशागतीने कसतो, त्याचप्रमाणे योग्य त्या ध्येय प्राप्तीसाठी मनाची अन बुद्धीची योग्य मशागत होणे अत्यावश्यक आहे. ही वेळ पेरणीची नसुन ती मशागतीची आहे. ह्या वेळेला तुम्हाला सर्व क्रिया जमीनीवर करुन पुर्णपणे तयार राहायचे आहे. एकदा का पाऊस पडला की या कसलेल्या जमिनीतून तुम्ही निवडलेले बीज पेरले अन् त्या पीकाची योग्य रितीने काळजी घेतली की जोमदार पीकाचे ध्येय नक्कीच पुर्ण होणार. म्हणून मनुष्याने एकदा का आपल्या ध्येयाची बीजे कसलेल्या मनात पेरली, त्याची योग्य मशागत व त्यावर योग्य ते परिश्रम घेतले आणि त्याला संयमाचे आणि चिकाटीचे खतपाणी घातले की मनाने निवडलेल्या ध्येय प्राप्तीला उशीर मुळीच लागणार नाही. तसेच ती ध्येयप्राप्ती तुम्हाला नक्कीच तो संपुर्ण आनंद, समाधान द्विगुनीत करुन देईल ज्याची मनाने तुमच्यासाठी निवड केलेली होती. म्हणून परिस्थितीच्या गरजेपोटी अडकलेल्या ध्येय व स्वप्नांना पूर्णपणे थांबवण्यापेक्षा, विसरण्यापेक्षा योग्य वेळ येईपर्यंत एक थांबा (पॉज) घेऊन नवीन सुरवात (रिस्टार्ट) करणे गरजेचे आहे. या मध्यंतरातील काळात आपल्या मनाची व बुद्धीची योग्य मशागत आपल्या ध्येय व स्वप्नांना लागणाऱ्या गोष्टींची जमवाजमव करून एकत्र सांगड घालून करावी. जेणेकरून हा थांबा देखील आपल्याला एक नवीन उत्साहवर्धक सुरवात करण्यास प्रवृत्त करेल आणि आपण स्वत: निवडलेले आपले ध्येय व स्वप्न साकार करण्यास मदत करेल. 

- राणी अमोल मोरे


2 comments:

  1. Absolutely true combinations of these three lead us to achieve our goal.. very deep and effectively written. Today’s youth must have to think over it.

    ReplyDelete
  2. Very good indeed.

    ReplyDelete

Your valuable comments are highly appreciated and very much useful to further improve contents in this Blog.

Recent Posts

तू राजा मी सेवक (Vol-2)

- रानमोती / Ranmoti

Most Popular Posts