प्रिय मैत्रिणींनो,
मी आज तुम्हाला माझे मत या पत्राच्या स्वरूपात लिहून पाठवीत आहे. हल्ली तंत्रज्ञानाच्या युगात, पत्राचं अस्तित्व तसं संपतच आलंय. परंतु, मी हे माध्यम खास करून तुमच्यापर्यंत पोहचण्यासाठी निवडलय, कारण पत्रात जो मायेचा, प्रेमाचा आणि आपुलकीचा जिव्हाळा वाचतांना मिळतो तो ह्या नवीन तंत्रज्ञानात कदाचित आढळणार नाही आणि हो तुम्ही सर्व माझ्या साठी खूप महत्वाच्या आहात म्हणून हा उठाठेव.
आपण सर्व आपल्यामध्ये अनेक छंद, अनेक वेग वेगळ्या गोष्टी जोपासत असतोच. काही तर लग्नाआधी आपल्या कला गुणांमध्ये अत्यंत पारंगत असतात. आपण प्रत्येकजण आई वडीलाकडे हट्ट धरून, आपल्या बऱ्याच गोष्टी नियमित जोपासत राहतो. मात्र, लग्नानंतर चित्र पूर्णतः बदलेलं असतं. कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःच्या गोष्टीचा त्याग करायला महिलाच पुढे येतात. स्वतःच्या आवडी निवडीला दुय्यम स्थान कधी प्राप्त झाले हे कळण्याआधीच त्या मुलांच्या संगोपनात, संसारात पूर्णत: तल्लीन झालेल्या असतात. मला असं अजिबात म्हणायचं नाही की कुटुंबातील सदस्य आपल्याला हे सर्व करायला भाग पाडतात. बऱ्याच वेळेला ते निर्णय आपले स्वतःचेच असतात. मग ह्या चक्रव्यूहात आपणच नकळत अडकत जातो. मग तुम्ही म्हणाल, कुटुंब महत्वाचे नाही का ? नक्कीच, कुटुंब महत्वाचे आहेच. पण स्वतःसाठी वेळ देणंही तितकंच महत्वाचं नाही का ? मग काय करायचं ? असा प्रश्न उभा राहतो. या प्रश्नासाठी आपल्याकडे पर्याय आहे, तो म्हणजे, दररोज पाच मिनिटे स्वत:साठी वेळ काढा आणि शांतपणे स्वतःलाचं प्रश्न करा माझ्यात काय वेगळं आहे, मी कोण आहे ? तेव्हा जे उत्तर जास्त प्रभावीपणे अंतःकरणातून बाहेर पडेल त्याला तुम्ही लगेच प्रतिसाद द्यायला सुरुवात करा आणि हो जी पण गोष्ट तुम्ही करण्यासाठी निवडाल त्याला तुम्ही स्वत:च नकारात्मक दृष्ट्या तोलत मोजत बसु नका, तर सकारात्मक दृष्ट्या पुढे जात रहा. तुम्ही निवडलेली गोष्ट काहीही असु शकते. उदाहरणार्थ, चित्र काढणे, सजावट करणे, नृत्य करणे, बोलण्याची वेगळी पद्धत निर्माण करून इतरांना हसवणे, अगदी रांगोळ्या काढणे इत्यादींसह काहीही.
आता तुम्ही म्हणाल यात काय मोठं. हे तर कुणीही करतं. तर मैत्रिणींनो ह्या गोष्टी वरवर जरी लहान वाटत असल्या तरी देखील तुमच्या आयुष्यात ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या शोधा, त्यात काम करणं सुरू करा आणि लक्षात ठेवा हे तुम्हाला दुसऱ्यांना दाखवायचं म्हणून करायचं नाही तर फक्त स्वतःसाठी करायचं आहे. या मागचं कारण असं की, वयाच्या चाळीशीपर्यंत कदाचित तुम्ही खुप व्यस्त, चुस्त व सुंदर असाल त्यानंतर मात्र नैसर्गिकरित्या हळूहळू सारंच ओझरायला लागतं आणि मग मुलंही मोठी होतात, त्यांनाही आपली जास्त गरज जाणवत नाही. तेव्हा रिकाम्या वेळी नकारात्मकता मनामध्ये शिरकाव करून वाढू लागते आणि मानसिक आजाराला कारणीभुत ठरते. जीवनातील खरा आनंद हळुहळू नष्ट व्हायला लागतो व स्वत:बद्दलच चिडचिड निर्माण व्हायला लागते. ह्या सर्व चक्रव्युव्हात अडकण्यापूर्वी, वेळेच्या आत, स्वत:ला वाचवा. आज जरी वरवर सर्व आपली काळजी घेतांना वाटत असले तरी उद्या चित्र बदलणार आहे यात शंका नाही. म्हणून दुसरं तिसरं कोणी येऊन तुम्हाला आनंद देईल या अपेक्षेपेक्षा स्वत:च स्वत:त आनंद शोधायला सुरुवात करा. आपल्या छोट्या छोट्या गोष्टींना छोटासा वेळ रोज देत चला आणि एक सुंदर शिदोरी जतन करत राहा, म्हणजे आज आणि भविष्यात तुम्हाला कधीही असं वाटायला लागलं की मी कोण, माझं अस्तित्व काय ? तेव्हा हिच शिदोरी तुम्हाला प्रतिसाद देत पुढे येईल आणि आनंदाने तुम्हाला खेळवून जाईल.
आपले छंद जोपासल्याने मनाची उर्जा वाढते आणि प्रत्येक कामामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करून जाते. तो आपल्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर फुलत जातो, मग वय कीतीही असो. एखादा सुर्य माझ्यासाठी उगवेल आणि तेव्हा मी स्वतःसाठी काही तरी करेल या भ्रमात बसण्यापेक्षा उगवलेला प्रत्येक सूर्य स्वतःच्या नावावर करत रहा. स्वत:च्या कला गुणांना, कौशल्याला वाव देऊन त्यांना जोपासून आनंद व ऊर्जा मिळवणे हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे आणि तो त्यांनी मिळवलाचं पाहिजे म्हणूनच हा संवाद.
धन्यवाद !
जोपासा आपला छंद, तोच देईल आनंद..!
आपली स्नेही,
(राणी अमोल मोरे)
ताई अगदी बरोबर म्हणतेस तु. खुप दिवसांनी आठवले माझेही काही छंद होते ते जोपासने राहूनच गेले. तु एखादी परिसंवाद घे ना या विषयावर.
ReplyDeleteVery nice ����
ReplyDelete