Search This Blog

Monday, June 1, 2020

मुंगळा ते मुंबई ..

मुंगळा ते मुंबई ..

वे तशी दुःखाचीच होती. आजे सारे वारले या दुःखद योगाने माझे मुळ सासरमुंगळागावी अंतिम संस्काराकरिता दोन-तीन दिवस गावाकडील लोकांबरोबर राहण्याचा योग आला. मुळ सासर ‘मुंगळा पण पतिच्या नोकरीमुळे मुंबईला स्थाईक आहोत. निरोप कळताच आम्ही रात्रीच घाई घाईने गावाकडे निघालो. सकाळी ११ वाजता मुंगळ्यामध्ये पोहोचलो. वातावरण दु:खद असल्याने मी एका ठिकाणी बरा वेळ गप्प बसूनच होते, पण डोके आणि मन मात्र शांत नव्हते. डोळे येणाऱ्या जाणाऱ्यांना अवती भवती असणाऱ्या परिस्थितीला बारकाईने टिपत होते. कान तेथील परिस्थितीचा आवाज न्याहळत होते. तर मन आणि डोकं दोन्हीही त्या सर्व परिस्थितीचे इत्यंभूत विश्लेषण करत होते. आपण स्थाईक आहोत त्या मुंगळा गावचा विरोधाभास समोर मांडत होते.

     मुंगळा हे गाव विदर्भातील वाशीम जिल्हयामध्ये. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण (मुंबईच्या) तुलनेत विदर्भामध्ये पाऊस हा कमीच पडतो. त्या वर्षाला तर पाऊसाने विदर्भाला तर दांडीच मारली होती. सर्व पाऊस कोकणात आणि पश्चिम भागात ओसंडून वाहत होता. यामुळे विदर्भातील शेतकरी वर्ग आणि सामान्य माणूस चिंताग्रस्त दिसत होता. दुबार पेरणी तर आधीच झालेली होती. आता दुष्काळाचे सावट ओढवणार या चिंतेतही बरेचजन अडकले होते. त्यात अशा दु:खद गोष्टी घडल्या की ह्या गरीब शेतकऱ्यांसमोर आणखी प्रश्न फणा काढून उभे ठाकतात. गावाकडची सासरची सर्वच माणसे तशी हालाक्याच्या परिस्थितीत गरीबित जीवन व्यतीत करणारी. कुणाकडे एक तर कुणाकडे दोन एकर अन कुणाकडे शेतीच नाही, दुसऱ्यांच्या शेतात मिळेल ते काम करून दिवसे ढकलणारी. बायकांची आणि लहान मुलांची तर सोयच नाही. तरुण मुली ज्यांची लग्न झाली आहेत त्या अति श्रमामुळे जणू म्हाताऱ्या दिसायला लागल्यात. कुणाला घालायला कपडे नाहीत, तर कुणाला राहायला धड घरही नाही. लहान  आई-वडील जे काही काबाड कष्ट करतात, त्यामध्ये ते विसरुन जातात की मुलांच्या आरोग्याकडे शिक्षणाकडे आणि स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे ज्यांच्यासाठी ते रात्रंदिवस धडपडतात त्यांचीच प्रगती मंदावलेली. आईच्या दुर्लक्षित पणामुळे लहान मुले काय खातात, काय पितात, त्यांची वाढ योग्य वेळेला योग्य प्रमाणात होते आहे का ? याकडे तर त्यांचे लक्ष  देखील नाही.

     याचे एक उदा. म्हणजे माझ्या मुलाहून चार-पाच महिन्याने  मोठा माझ्या मोठ्या जाउबैइच बाळ, माझं बाळ दीड वर्षाचं, म्हणजे ते जवळ-जवळ दोन वर्षाचं नक्कीच असणार. परंतु, ते एखादा शब्द बोलायचे तर सोडा धड व्यवस्थित ताकदीने उभा राहून चालू शकत देखील नाही एवढं अशक्त आणि कमजोर. मी त्याचे निरीक्षण केले तेव्हा लक्षात आले, त्याला योग्य सकस आहार बालपणातील औषधे वेळेत मिळाल्याने त्याची अशी अवस्था झालेली आहे. त्याची आई देखील परिस्थितीमुळे तशी कमजोरच होती. दिवसभर शेतात राबून रात्री कपडे शिवण्याची मशीन चालवून संसाराचा गाडा नवऱ्याबरोबर हाकत होती. ती सर्व काम तिच्या बाळाच्या उज्वल भविष्याचे स्वप्न ठेवूनच करत होती. पण कुपोषणामुळे बाळाची शारिरिक मानसिक वाढ जर आज वेळेवर झाली नाही तर उद्या बाळाचे भविष्य अंधारमय आहे, याची तिला निरक्षरता व अज्ञानामुळे जाणीवचं उरली नव्हती. पण जेव्हा मी तिला ह्या गोष्टीवर चर्चा करून योग्य काळजी घेण्यास सांगितले तेव्हा तिला ती गोष्ट पटली तिने त्या गोष्टीला सुरुवात केली.  या सर्व परिस्थितीतून माझ्या एक गोष्ट लक्षात आली जर गावकडच्या ह्या महीला आपण सांगितलेल्या गोष्टीचा एवढया काळजीने अवलंब करतात तर मग गावातीलच एखादी ग्रामीण आरोग्य केंद्रातीलआशायांना दर महिन्याला भेट देऊन बाळांच्या आरोग्याच्या, स्वच्छतेच्या  गोष्टी समजावून सांगेल तर त्या नक्कीच या परिस्थितून बाहेर येतील. ही झाली एक गोष्ट आता दुसरी परिस्थिती पाहू.     

     गावाकडचा माझा छोटा चुलत दीर निळू ८५% मार्क घेऊन दहावी पास झाला. माझ्या पतिच्या जबरदस्तीने वाशीमला सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्रवेश घेतले. आता कॉलेज सुरु होणार आहे पण घालायला कपडे नाहीत. शहराच्या ठिकाणी मोठ्या कॉलेजला जायचं तर कपडे बरोबरच पाहिजे, या काळजीत निळू होता. जेव्हा आम्हाला ही गोष्ट कळली तेव्हा आम्ही थोडीफार आड जुनी कपडे काही नव्यांसह त्याला घेऊन दिलीत. मुंबईत मॉल मध्ये दोन-पाच हजार रुपया पर्यंत एक एक शर्ट विकत घेतल्या जातो आणि तो थोडा आउट फ्याशन झाला की लगेच फेकून दिला जातो. पण आपण जे कपडे टाकून देतो तसे कपडे गावाकडच्या त्या गरीब लोकांना घालायला तर दूर बघायला सुध्दा मिळत नाहीत. येथे महिन्याला एखादं कुटुंब फक्त आरामदायी गोष्टी किंवा फ्याशन म्हणून खरेदी करायला जेवढा पैसा वाया घालवते तेवढ्या पैशात ती गरीब लोक वर्षानुवर्ष मुलभूत  कपडे घेऊ शकत नाहीत. इतका मोठा हा विरोधाभास आहे. मग अशा वेळेस आपण जी काही जुनी पण घालण्यायोग्य कपडे कचऱ्यात फेकतो त्यापेक्षा अशा गरीब लोकांना ज्यांना गरज आहे अशांना दिली तर योग्यच होईल.

हळूहळू एक एक प्रश्न पुढे सरसावत होता. गावाच्या बायकासोबत गप्पा मारताना एक गोष्ट लक्षात आली. ती अत्यंत महत्त्वाची होती, ती म्हणजे गावाकडे अशा काही महिला आहेत, ज्या पूर्णपणे निराधार आहेत, ज्यांना पती, मुलं-बाळ कुणीही नाही, शासनाची निराधार योजना तशी त्या गावामध्ये सुध्दा लागू होती पण महिन्याला ६०० रु. यानुसार मिळणारी जी रक्कम आहे, ती पाहता आजच्या महागाईने झपाटलेल्या जगात नगण्य आहे. अशा ह्या महिला ज्यांना मागे पुढे कोणीच नाही, राहायला घर नाही अशा या महिलांचा प्रश्न फार बिकट आहे. याउलट पण याच परिस्थितीला उत्तर देणारी परिस्थिती मुंबईत आहे. मुंबईचं जगण हे फार धकधकीचं आणि फार वाईट आहे तेथे बायका नोकरी आणि बाळ दोन्हीही सांभाळू शकत नाही. लहान मुलांकडे लक्ष दयायला कोणी जवळचे आणि विश्वासाचे लोक मिळत नाही. घर कामाला तर बायका मिळनं फार कठीण आणि मिळाल्या तर त्यांचेच चोचले पुरवणे आणि त्यांना टिकवणे त्याहून कठीण. मग अशा परिस्थितीमध्ये ह्याच गावाकडील निराधार बायका यांना मदत म्हणून आपण त्यांना लहान मुलांना सांभाळणे, त्यांना खाऊ घालणे, घरातील कामे इत्यादी योग्य वाटतील ती कामे देऊन त्यापोटी महिन्याला चार पाच हजार दिल्यास काहीच हरकत नाही. कारण एक लहान मुल पाळणा घरात ठेवायला मुंबईत कमीत कमी पाच सहा हजार रुपये मोजावे लागतात आणि घरातील कामाला बाई लावली तर तिचा महिन्याचा पगार मुंबईतील काम करायला वेळ नाही किंवा ज्या बायकांना घर कामाचा कंटाळा येतो अशांना नक्कीच माहिती आहे. या उपायामुळे त्या गावाकडील निराधार लोकांना आधार मिळेल आणि मुंबईच्या बायकांना सुध्दा आणखी सोयीचे होईल.

     आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईत काही पैशाने श्रीमंत तथाकथित समाज सेवक आहेत जे मातेच्या ममतेपोटी भाऊक होऊन वारलेल्या आई वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला लाखो रुपयांचे सभागृह बुक करुन ज्यांना डॉक्टरांनी डायटिंग सांगितले आहे अशांना भोजन उल्पोपहार देतात व लाखो रुपये खर्च करतात. दुसरीकडे ह्याच समाज सेवक लोकांच्या गावातील गरीब विद्यार्थी नाममात्र रुपयांच्या शैक्षणिक शुल्कामुळे हुशार असूनही पुढे शिक्षण घेऊ शकत नाही. परिणामी परिस्थितीला कंटाळून बऱ्याच वेळेला मदतीच्या हाता अभावी जीवनाला सुरुवात होण्यापुर्वी मृत्युला आलिंगण घेतात. परंतु, दुर्दैवाने त्यांचे स्मरण तर सोडा पण जाणीवही कोणी ठेवत नाही. मातापित्यांचे पुण्यस्मरण करणे त्याकरिता कार्यक्रम आयोजित करणे योग्यच, पण आपल्या डोळयासमोर अशी परिस्थिती असताना आणि त्यात आपण स्वत:ला समाज सेवक म्हणवून घेत असू तर हे पुण्यस्मरण खरच योग्य आहे का ? ज्यांच्या ढेऱ्या आधीच शर्टाची बटनं तोडून बाहेर पडू पाहत आहेत अशांना सो कॉल्ड हेवी ब्रेकफास्ट देणे बरोबर का चूक हे ज्याचे त्यांनीच ठरवावे.

     ह्या सर्व प्रश्नांमध्ये काही चांगल्या गोष्टी सुध्दा गावाकडे आहेत. ज्यामुळे मुंगळा गाव मुंबईपेक्षा फार फार श्रीमंत वाटते, ती गोष्ट म्हणजे तेथील लोक एकमेकांना दु:खात आणि सुखात  कुठल्याही परिस्थितीत फार मदत करतात. तेथे माणसे माणसाना ओळखतात. आडल्या वेळेला लगेच शेजारी धावून येतात. मुंबईत मात्र आपण जेथे राहतो तेथील शेजारी फक्त नावापुरते शिल्लक असतात आपल्या बाजूला कोण राहते, कशा परिस्थितीत राहते, याची त्यांना जराही जाणीव नसते. अश्या आमच्या श्रीमंत मुंबईतील श्रीमंत पण गरीब मनाच्या लोकांमुळे मुंबई मला मुंगळ्यापेक्षा कित्येक पटीने गरीब वाटते.

     मुंबई ते मुंगळा रस्ता जरी पक्का असला तरी समानता आणि परिस्थितीच्या बाबतीत नक्कीच कुठे कुठे तुटक तर कुठे कुठे अजिबातच तयार झालेला नाही. आपण कितीही  प्रयत्न केले तरी मुंगळा गाव मुंबईसारखं होऊ शकत नाही. परंतु, सर्वांनी आपल्याजवळ असलेल्या संसाधनांचा योग्य रितीने वापर केल्यास असमानतेची ही दरी नक्कीच दूर करता येईल आणि जगण्या योग्य असे गाव नक्कीच तयार करता येईल.

वरील गोष्ट प्रथमदर्शनी मुंगळा ते मुंबई अशी जरी निदर्शनास येत असली तरी मुंगळयासारखी अनेक गावे विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आजही ओसाड झालेली आहे आणि माझ्या कुटुंबसारखीच लाखो कुटुंबे मुंबईतच नव्हे तर अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये आप आपली गावे सोडुन स्थलांतरित झालेली आहेत. साधारणतः ३०% कुटुंबे ही योग्य रितीने नोकऱ्यांमुळे किंवा धंद्यामुळे सधन झालेली आढळतात. अशा प्रत्येक कुटुंबाने आपल्या गावाकडील गरीब लोकांना जमेल तेवढी मदत केली तर नक्कीच परिस्थिती बदलेल. प्रत्येकाने योग्य रितीने स्वत:चे सामाजिक कर्तव्य पार पडल्यास गोर गरिबांना मदत होऊन संपूर्ण देशाचा विकास होण्यास नक्कीच हातभार लागेल. तसेच प्रत्येक नागरिक हा देशाच्या विकासात सहभागी आहे असे तो गर्वाने म्हणू शकेल.

-राणी अमोल मोरे



x

1 comment:

Your valuable comments are highly appreciated and very much useful to further improve contents in this Blog.

Recent Posts

तू राजा मी सेवक (Vol-2)

- रानमोती / Ranmoti

Most Popular Posts